B24NEWS LIVE TV CHANNEL, The first and leading Marathi news web portal and TV News channel of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
• Email:b24news@yahoo.com
आपले ध्येय आधी निश्चित करा, मग वाटचाल करा : डॉ. उल्हास देवरे
नियमित कमीत कमी पाच वर्तमानपत्र वाचनाचा दिला सल्ला
पारोळा. येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांचे स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महसूल विभागाच्या ‘युवा संवाद’ या उपक्रमांतर्गत तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी किसान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षा द्यायच्या आधी आपले ध्येय निश्चित करा! वडिलांनी सांगितले म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू नका. कुठल्या पदासाठी तयारी करत आहात, ते आधी निश्चित, करा मग योग्य पुस्तकाची निवड करा. यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षा विषयक आपले स्वतःचे अनुभव सुद्धा सांगितले, हे अनुभव ऐकत असताना स्वयंसेवक गहिवरून आल्याचे दिसून आले. चाळणी परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यामध्ये समन्वय कसा साधावा, तिन्ही टप्प्याची तयारी कशी करावी, याविषयीचे सखोल मार्गदर्शन त्यांनी या वेळेला केले. तसेच नियमित विद्यार्थ्यांनी कमीत कमी पाच वर्तमानपत्र वाचायला पाहिजे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे वर्तमानपत्राची मांडणी गृहीत धरून, काय वाचायला हवं हे सुद्धा त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली एक डायरी मेंटन केली पाहिजे आणि या डायरीच्या माध्यमातून आपल्या नोट्स या काढायला पाहिजे, म्हणजे पन्ना पुस्तकाचं काम एक पन्नास पानाची डायरी सुद्धा करू शकते, असे उत्तम उदाहरण त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून सांगितले. तसेच मासिक, वर्तमानपत्रातले लेख आणि त्याच्या नोंदी कशा कराव्या हे सुद्धा त्यांनी या वेळेला सांगितले. तसेच यशस्वी लोकांचे नाव आणि नाते शोधले जातात. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत लोकांच्या नजरेत तुम्ही कोणीही नसता, पण यशस्वी झाले की लोक तुमचे नाते शोधायला लागतात. त्यामुळे निगेटिव्ह विचारांच्या लोकांकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा असे त्यांनी या वेळेला सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदीप औजेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. काकासाहेब गायकवाड यांनी केले, तर आभार प्रा. शिरीष सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे २०० स्वयंसेवक उपस्थित होते. माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सचिन नांद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक केले.